|  | प्रिय वाचक...
 २००५ साली डायमंड पब्लिकेशन्सची स्थापना झाली. तेव्हापासून  गेल्या 9 वर्षांत डायमंडकडून ७०० हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली  आहेत. यात ४५ संज्ञाकोश आणि अनेक शब्दकोश प्रकाशित करून संदर्भग्रंथ  आणि कोशवाङ्मयाची परंपरा डायमंडने निर्माण केली. ‘इंडियन काउन्सिल  ऑफ हिस्टॉरिक रिसर्चसारख्या’ (ICHR) सरकारमान्य प्रतिष्ठित  संस्थेबरोबर करार करून धर्मानंद कोसंबी, रजनी पाम दत्त,  जदुनाथ सरकार यांसारख्या दिग्गजांची १४ पुस्तके डायमंडने मराठीत आणली.
 संदर्भग्रंथ, संज्ञाकोश, वैज्ञानिक कोश, ज्ञानकोश  असे वैविध्यपूर्ण कोशवाङ्मय डायमंडने प्रकाशित केले. विधिशास्त्रकोशासारखा  कायद्यावर आधारित स्वतंत्र आणि अद्ययावत माहितीने परिपूर्ण कोश डायमंडने प्रकाशित केला.  प्रकाशक दत्तात्रेय पाष्टे यांच्या कल्पनेतून वाणिज्यकोशासारख्या एकमेवाद्वितीय  ग्रंथाची निर्मिती झाली आहे आणि ५ खंडाच्या या कोशाचे स्वरूप कोशाच्या रूढ कल्पनेहून  स्वतंत्र आणि वाणिज्य शाखेच्या सर्व स्तरांवर अत्यंत उपयुक्त ठरेल असे आहे.  तसेच इतर कुठल्याही भारतीय भाषेत उपलब्ध नसलेला नद्यांवर आधारित ३ खंडांचा  सरिता कोशही डायमंडने प्रकाशित केला आहे. इंग्रजी-हिंदी-मराठी अशा तीन भाषांत विविध क्षेत्रांशी संबंधित  संज्ञांचा भरघोस पुरवठा करणारा ‘शब्दानंद’सारखा एकमेवाद्वितीय कोश डायमंड पब्लिकेशन्सच्या नावावर जमा आहे.
 याशिवाय लहान मुलांसाठी आणि  विशेषतः कुमार गटासाठी डायमंड पब्लिकेशन्स सातत्याने निर्मिती करत असते. त्यासाठी ‘कनक बुक्स’, कुमार वाङ्मय  विभागाची निर्मिती केली गेली आहे. याची सुरुवात साहित्यात मानदंड  ठरलेल्या ‘द हॉबिट’ या कादंबरीने झाली आणि  त्यानंतर शेरलॉक होम्स, कोरलाइन आणि सुप्रसिद्ध ‘लॉर्ड ऑफ द रिंग्जचा’ मराठी अनुवाद प्रकाशनाच्या वाटेवर  आहे.
 ललित आणि वैचारिक साहित्य निर्मितीतही  डायमंडची उल्लेखनीय वाटचाल चालू आहे. संगणकीय क्रांती घडवणार्या स्टीव्ह जॉब्झसारख्या उद्योजकाचे अधिकृत आत्मचरित्र डायमंडने पहिल्यांदा  मराठीत आणले. आयन रँडसारख्या तत्त्वेवेत्तीच्या ‘अॅटलस श्रग्ड’ आणि ‘फाउंटनहेडसारख्या’  कादंबऱ्यांचे दर्जेदार अनुवाद, ‘द रोड’सारख्या पुलित्झर पुरस्कारविजेत्या कादंबरीचा अनुवाद, ‘टिंकर टेलर सोल्जर स्पाय’सारख्या वास्तव सूक्ष्म राजकीय  संदर्भांनी युक्त कादंबरीचा अनुवाद, जॉर्ज ऑरवेललिखित  ‘१९८४’ या कादंबरीचा अनुवाद, तसेच वैचारिक घुसळण घडवून आणणाऱ्या विषयावर आधारित ‘राष्ट्रीय  स्वयंसेवक संघाने गमावलेली वर्षे’ हे पुस्तकही डायमंडच्या खात्यावर  रुजू आहे.
 तसेच ओसामा बिन लादेनच्या १०  वर्षांच्या शोधमोहिमेचे प्रत्ययकारी आणि वास्तवदर्शी चित्रण करणारे पुस्तक  ‘मॅनहंट’ नुकतेच प्रकाशित झाले आहे. ‘जेरुसेलम’ या शहराचा इतिहास सांगणारे सायमन माँटेफ्युरेचे  अतिशय अभ्यासूपणे लिहिलेले ‘जेरुसेलम - द बायोग्राफी’ या पुस्तकाचा अनुवाद प्रकाशनाच्या मार्गावर  आहेत.
 भविष्यात अशीच अभ्यासू,  मनोरंजक आणि पुरेपूर प्रोत्साहन देणारी पुस्तके घेऊन आम्ही आपल्या भेटीला  येत राहूच. कळावे.
 दत्तात्रेय पाष्टे संचालक
 डायमंड पब्लिकेशन्स
 |  |